Wednesday, October 6, 2010

आषाढी एकादशी व पालखी सोहळा - अमोल नाईक

सप्रेम जय हरी !!!

'जाता पंढरीसी सुख वाटे जीवा' .. असे म्हणत लाखो वारकरी, माउली ज्ञानेश्वर महाराज, जगदगुरू तुकोबारायांच्या पालखी समवेत वाटचाल करीत पंढरपूरकडे श्री क्षेत्र आळंदी व देहू कडून मार्गस्थ झाले. जेष्ठ महिना उजाडला कि वारकरी मंडळीना वेध लागतात ते आषाढी एकादशीचे, कधी एकदा जेष्ठ वद्य अष्टमी येते? आणि पालखी सोहळा सुरु होतो असा भाव त्यांच्या मनात असतो . सदर पालखी सोहळ्याला कोणालाच आमंत्रण नसताना देखील फक्त विठुरायाच्या दर्शनाच्या ओढीने लाखो वारकरी धावत, लगबग करीत या वारी सोहळ्यात सहभागी होतात ' माझे जीवीची आवडी | पंढरपुरा नेईन गुढी || ' , संपदा सोहळा नावडे मनाला | लागला टकळा पंढरीचा || असा काहीसा भाव या वारकरी मंडळीन मध्ये असतो.
जेष्ठ वद्य सप्तमी ला तुकोबाराय तर जेष्ठ वद्य अष्टमीला ज्ञानोबाराय मार्गस्थ होतात. या संपूर्ण दिंडी सोहळ्याच नियोजन अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि काटेकोर नियमांचे पालन करून केले जाते. पालखी सोबत असलेले माउलींचे मुख्य चोपदार ज्या सूचना करतील त्या सर्व सूचनांच पालन वारकरी करत असतात. या दोन्ही पालख्यांच्या मागे व पुढे अश्या विविध मठकरी, फडकरी, सेवाधारी आणि गावागावातील भजनी मंडळाच्या दिंड्या क्रमांकासहीत वाटचाल करत असतात. या प्रत्येक दिंडीचे नेतृत्व त्या दिंडीचे मालक, चोपदार आणि विणेकरी करीत असतात. प्रत्येक दिंडीत एक विणेकरी, दोन पखवाजी, दोन चोपदार, झेंडेकरी, टाळकरी, कळशी आणि तुळशी घेतलेल्या महिलांचा समवेश असतो.

या संपूर्ण दिंडीच नियोजन अतिशय वाखाणण्या जोग असत. दिंडीत स्वयंपाकाची व्यवस्था करणाऱ्या महिला आणि राहुटी च्या उभारणीची सोय करणारे पुरुष मंडळी हे वेगळे असतात ते पालखीच्या ठरलेल्या मुक्कामाच्या आधीच तेथे पोहचून हि सर्व सोय करतात, दिंडी पादक्रमण करत असताना रोजचे अभंग ठरलेले असतात. साधारण सकाळी ४ ला काकड आरती करत पालखी मार्गस्थ होते सकाळी ९ वाजेपर्यंत सर्वांच्या अंघोळी आणि देवपूजा आटपल्यावर पालखी पुन्हा मार्गस्थ होते. दुपारी नैवैद्य झाल्यावर वारकरी भोजन करून थोडासा आराम करतात व पुन्हा पालखी आपल्या पुढील मुक्कामाच्या दिशेने मार्गस्थ होते. संध्याकाळी समाज आरती होते आणि पालखी विसावा घेते. रात्री सर्व वारकरी मंडळी भजन , हरिपाठ करतात माउलींच्या पालखी समोर मानाचे फडकरी कीर्तन करतात. असा एकूण दिवसभराचा साधारण क्रम असतो.

माउलींची पालखी अनुक्रमे पुणे, सातारा, सोलापूर या ३ जिल्ह्यातून मार्गक्रमण करते तर तुकोबारायांची पालखी अनुक्रमे पुणे व सोलापूर या २ जिल्ह्यातून मार्गक्रमण करत पंढरपूर गाठते.सदर पालखी सोहळा सुरु असताना अनेक ठिकाणी दोन्ही पालख्यांची उभी व गोल अश्या दोन पद्धतीची रिंगणे होतात. त्यात तुकोबारायांच्या पालखीत तोंडले - बोंडले या गावी 'धावा' हा विशेष सोहळा होतो, तुकोबाराय जेव्हा वारी करत होते तेव्हा ह्याच तोंडले - बोंडले येथील उताराच्या रस्त्यावर तुकोबारायांना पंढरपूर मधील मंदिराचा कळस दिसला आणि भगवंताची भेट लवकर व्हावी ह्या हेतूने तुकोबाराय येथूनच धावत निघाले, आजही वारकरी ती परंपरा जपत आहेत.
हा पालकी सोहळा म्हणजे एक अदभूत असा सोहळा आहे. ह्या पालखी सोहळ्यात आबालवृद्ध , महिला सर्वच सामाविष्ट असतात, अनेक सामाजिक संस्था हि ह्या वारकरी मदलीच्या सेवेसाठी निरपेक्ष बुद्धीने झटत असतात. वारकरी मंडळींची सेवा करण्यात ते सार्थकता मानतात. पालखी सोहळ्य दरम्यान अनेक विविध विषयांवर आधारित पालख्या हि पाहायला मिळतात उदा: व्यसनमुक्ती, ग्रामस्वच्छता, पर्यावरण रक्षण ई.

ह्या पालखी सोहळ्यात सर्वधर्मसमभाव पाहायला मिळतो, तुकोबारायांचा पहिला मुक्काम हा अनगडशहा बाबाच्या समाधी जवळ होतो या वेळी सर्व मुसिल्म बांधव वारकरी मंडळींचे प्रेमभावाने स्वागत करतात. वारीत सर्वात महत्वाचा टप्पा मनाला जातो तो दिवे घाटाचा कारण ह्या वेळी एकादशी असते आणि सर्व वारकरी उपाशी पोटी सलग २४ किलोमीटरचा हा घाट चालत असतात कुठेही मुक्कामाची सोय ह्या घाटावर नसते, परंतु माउलींच्या संगतीत व विठ्ठल नामाचा जप करीत वारकरी हा अवघड घाट सहजरीत्या पार करतात. संपूर्ण दिवे घाट शुभ्र वस्त्र परिधान केलेल्या वारकरी मंडळीनी फुलून जातो, अतिशय नयनरम्य दृश्य अनुभवायला मिळते . सासवड हे माउलींचे धाकटे बंधू सोपान काकांचे शहर माउली इथेही मुक्काम करतात. पुढे माउली जेजुरी मुक्कामी असताना मोठ्या भक्तिभावाने वारकरी येथील भंडारा उधळत जय मल्हाराचा गजर करतात, हा अनुपम्य सोहळा पाहायला लाखो लोक उपस्थित असतात. मजल दर मजल करत अनेक खेळ खेळत हरिनामाचा गजर करत ह्या दोन्ही पालख्या आषाढ शुद्ध नवमी ला वाखरी ला येऊन पोहचतात आणि इथेच वारकरी मंडळींचा महासागर जमा होतो, भक्तीचा महासंगम यावाखरी मुक्कामी पाहायला मिळतो, अनेक जिल्ह्यातून आलेल्या विविध संतांच्या पालख्या ह्या वाखरीत एकत्र येतात, त्या पैकी महत्वाच्या पालख्या म्हणजे शेगाव चे गजानन महाराज , पैठणहून आलेले एकनाथ महाराज, सासवड हून आलेले सोपानदेव, त्रंबकेश्वरहून आलेले निवृत्तीनाथ ई. आषाढ शुद्ध दशमीला सायंकाळी ह्या सर्व पालख्या पंढरपुरात दाखल होतील.


सर्व वारकरी विठुरायाच्या दर्शनाला रांगच रांग लावतील यातील बरेच वारकरी तर दर्शनाविनाच राहतात, त्यांना मुख दर्शनावरच समाधान मानावे लागते काही वारकरी तर फक्त कळसाचे दर्शन घेऊन समाधान मानतात कारण "तुका म्हणे मोक्ष देखिल्या कळस | तात्काळ हा नाश अहंकाराचा || ". भगवंताचे दर्शन घेण्याचेही काही नियम हे वारकरी पाळत असतात "पंढरीचा वास चंद्रभागे स्नान | आणिक दर्शन विठोबाचे ||" किंवा "चंद्रभागे स्नान विधी तो हरिकथा | तेणे सदा चित्ता समाधान || " या न्याया प्रमाणे पहिला चंद्रभागेचे पवित्र स्नान करून हि वारकरी मंडळी दर्शनासाठी गर्दी करतात पांडुरंग परमात्म्याचे दर्शन घेण्याआधी हि सर्व मंडळी सर्वप्रथम नामदेवरायांच्या पायरीवर नतमस्तक होतात.
पंढरपुराचे महिमान तसे फार अवर्णनीय आहे " सर्वोत्तम तीर्थ क्षेत्र आणि देव | शास्त्रांनी हा भाव निवडीला |" असे पंढरपूर च्या बाबतीत शास्त्राने वर्णन केले आहे . पवित्र अशी चंद्रभागा नदी या तीर्थक्षेत्रात आहे "अवघीच तीर्थे घडली एक वेळा | चंद्रभागा डोळा देखियेला || " ह्या चंद्रभागेच्या तीरावर पुंडलिकाचे मंदिर आहे. पुंडलिका जवळ सर्व तीर्थ अंघोळ करण्यास येतात असे शंकर भगवान सांगतात " शंकर सांगे ऋषीजवळी | सर्व तीर्थे माधान्यकाळी | येती पुंडलिका जवळी | करिती अंघोळ वंदिती चरण | अश्या अनेक गोष्टी आहेत, आपण पंढरीची वारी केल्यास आपल्याला हि त्या अनुभवास येतील. शेवटी जाता जाता थोडक्यात पंढरपुरच महिमा सांगतो आणि इथच थांबतो.

एका पंढरीचे महिमान | राउळे तितुके प्रमाण | तेथील तृण आणि पाषाण | ते हि देव जाणावे ||
पंढरी पंढरी | म्हणता पापाची बोहरी ||
उठाउठी अभिमान | जाये ऐसे स्थळ कोण | ते या पंढरीसी घडे | खळा पाझर रोकडे ||

अश्या या पवित्र " भीमातीरी एक वसविले नगर| त्याचे नाव पंढरपूर रे || " पंढरपूर क्षेत्रात "भाविकासाठी उभा | विठू कैवल्याचा गाभा || " , "वाट पाहे उभा भेटीची आवडी | कृपाळू तातडी उतावीळ ||" अश्या भगवान पांडुरंग परमात्म्याच्या चरणी या आषाढी एकादशी निम्मित साष्टांग दंडवत !!
बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल | श्री ज्ञानदेव तुकाराम || भगवान पंढरीनाथ महाराज कि जय

आपला नम्र
संतचरणानुदास
अमोल नाईक
जिल्हा सचिव, श्री समस्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना [उत्तर मुंबई] 

4 comments:

  1. mast amol, are mala ata paryant asach vatayach ki tu varkari vagaire kahi nahis, but its good to know tht we r having some one divine mind with us

    ReplyDelete
  2. अमोल साहेब अतिशय सुंदर माहिती आणि सुंदर ब्लॉग
    आपल्या ब्लॉगला मनपूर्वक शुभेच्छा !

    ReplyDelete
  3. thanx ganesh & Vikram...

    @ Vikram - Shabdrachnet Adkhalalo tar nakki madat magen...

    ReplyDelete